रम्य समुद्रकिनारे आणि अपूर्व खाद्ययात्रा- रत्नागिरी

नवम्बर 14, 2008

2008-10-11_15-24-31_med_a13167e4_n_000_000_000थिबा पॅलेस, राजापूरची गंगा, हेदवीचं गणेशमंदिर, हर्णे-गणपतीपुळे-वेळणेश्वरचे किनारे…
असं सारं रत्नागिरी जिल्ह्यात भटकताना पाहायलाच हवं.
रत्नागिरी म्हणजे कोकणचं वेगळं वैभव. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, विष्णूशास्त्री चिपळूणकर, स्वातंत्र्यवीर सावरकर या सर्वांशी रत्नागिरीचं नाव कायमचं जोडलं गेलेलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातच अनेकांचं श्रद्धास्थान असणारं गणपतीपुळ्याचं गणेशमंदिर आहे. हेदवी इथला दशभुज लक्ष्मीगणेश आणि चिपळूणपासून 13 किलोमीटरवर असणारा परशुराम गणेश तसंच आंजर्ले येथील कड्यावरचा गणपती यांना मानणाऱ्या भाविकांची संख्याही कमी नाही. राजापूरची गंगा पाहायची तर त्यासाठीही रत्नागिरी जिल्ह्यात भटकंती करायला हवी. याखेरीज डेरवणची शिवसृष्टी, गुहागर, दिवेआगर यांसारखे समुद्रकिनारे यांनीही रत्नागिरी जिल्हा समृद्ध केलेला आहे. श्री.ना.पेंडसे, चि.त्र्यं.खानोलकर यांच्यासारख्या लेखकांनी शब्दरुपातून मांडलेला कोकणचा हा परिसर म्हणजे “थकल्या मनांना ताजवा देणारी, हिमाचल प्रदेश आणि केरळ इतकंच निसर्गसौंदर्य असणारी देवभूमी’ आहे. हिचा उल्लेख “परशुरामभूमी’ असाही केला जातो.

रत्नागिरीपासून अगदी जवळ म्हणजे अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर रत्नदुर्ग हा किल्ला आहे. रत्नदुर्ग हा जलदुर्गात मोडणारा किल्ला. पूर्वी हा किल्ला पूर्णपणे पाण्यात होता. आता हा किल्ला रत्नागिरी शहराशी जोडला गेलेला आहे. बहामनी काळात उभारल्या गेलेल्या या किल्ल्याला एकूण 27 बुरूज होते. आता त्यापैकी 7 बुरुज आणि तटबंदी शिल्लक आहे. सध्या या किल्ल्यावर भगवती देवीचं मंदिर, दीपगृह आणि काही घरं आहेत. या किल्ल्यावर जिचं मंदिर आहे ती भगवती म्हणजे कोल्हापूरच्या महालक्ष्मीची बहीण आणि तिने महालक्ष्मीच्या सूचनेवरून रत्नासुराचा पाडाव केला व ती कायमस्वरुपी रत्नदुर्ग किल्ल्यावर राहाण्यासाठी आली, अशी आख्यायिका आहे. या देवीची स्वयंभू मूर्ती अडीच फूट उंच आहे. देवीच्या हातात शंख, चक्र, ढाल, तलवार अशी आयुधं आहेत आणि देवी महिषासुरावर बसलेली आहे. दरवर्षी नवरात्र आणि शिमगा यावेळी मंदिरात उत्सव असतो.
रत्नागिरी शहराला भेट देत असताना लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं पतितपावन मंदिर आणि थिबा पॅलेसला भेट द्यावी. थिबा पॅलेसची बांधणी 1910-11 मध्ये करण्यात आली. आत्ताचं म्यानमार म्हणजेच पूर्वीच्या ब्रम्हदेशच्या थिबा नावाच्या राजासाठी बांधण्यात आलेला राजवाडा म्हणून या राजवाड्याला “थिबा पॅलेस’ या नावाने ओळखण्यात येतं. 1916 पर्यंत या राजवाड्यात म्यानमारच्या राजा व राणीचं वास्तव्य होतं आणि अगदी अलीकडेपर्यंत त्यांची मुलगीही राहात होती. आता मात्र हा राजवाडा एक प्रादेशिक वस्तुसंग्रहालय किंवा “हेरीटेज हॉटेल’ बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. सागरी जीव संशोधनात रस असणाऱ्यांनी रत्नागिरीतील “मरीन बायॉलॉजिकल रिसर्च स्टेशन’ला भेट द्यावी. सध्या हे केंद्र दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाशी जोडलेलं आहे. या ठिकाणी एक छान मत्स्यालय/संग्रहालय पाहायला मिळू शकतं.

गणेशभक्तांचं श्रद्धास्थान
गणपतीपुळे हे रत्नागिरीपासून 40 कि.मी. अंतरावर असलेलं श्रीगणेशाचं स्वयंभू स्थान. या ठिकाणच्या 300 फूट उंचीच्या संपूर्ण टेकडीलाच गणपती मानण्यात येतं. येथील मंदिर सुमारे 400 वर्षांपूर्वीचं आहे. देवळाला प्रदक्षिणा म्हणजे संपूर्ण टेकडीला प्रदक्षिणा घालावी लागते. गणपतीपुळे येथील देवतेला पश्‍चिमद्वार देवता म्हणून ओळखण्यात येतं. इथे दर संकष्टीला आणि अंगारकी संकष्टीलाही मोठी गर्दी असते. इथला समुद्रकिनारा रमणीय तसंच राहण्याची वेगवेगळ्या प्रकारची सोयही इथे उपलब्ध आहे.
गणपतीपुळ्यापासून अवघ्या 1 कि.मी. अंतरावर असणारं मालगुंड म्हणजे ख्यातनाम मराठी कवी केशवसुत यांचं जन्मस्थान. मालगुंड येथील केशवसुतांच्या घरी आता त्यांचं स्मारक उभारण्यात आलं आहे. गणपतीपुळ्यापासून साधारण 35 कि.मी. अंतरावर जयगड हा किल्ला आहे. 17 व्या शतकात या किल्ल्याची उभारणी करण्यात आलेली आहे.

गणपतीपुळ्याप्रमाणेच रत्नागिरीपासून 22 कि.मी. अंतरावर असणाऱ्या पावस गावाजवळ गणपतीगुळे हे गणेशाचं स्थान आहे. पावस येथे स्वामी स्वरुपानंदांचा आश्रम आहे आणि तिथे कायम भाविकांची गर्दी असते; तर गणपतीगुळे येथील गणपतीला गलबतवाल्यांचा गणपती म्हणूनही ओळखलं जातं. संकटाच्यावेळी 11 फूट उंचीची शिळा जहाजातील कर्मचाऱ्यांनी गणपती म्हणून पूजली आणि त्यांच्यावरचं संकट दूर झालं, तेव्हापासून गलबतवाल्यांच्या स्वयंभू दक्षिणाभिमुख गणेशावर अनेकांची श्रद्धा निर्माण झाली, असं सांगतात.

प्राचीन मंदिरांनी समृद्ध भाग
रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण या गावाला पूर्वी स्वत:ची अशी ओळख नव्हती. पण या गावातील विठ्ठलराव गणेश जोशी तथा दिगंबरदास महाराज यांनी या ठिकाणी शिवसृष्टी उभारण्याचा संकल्प सोडला आणि तो पूर्णही केला. जोशी यांनीच समर्थ रामदास यांचं स्मारकही उभारलं आहे. डेरवणमध्ये उभारण्यात आलेल्या शिवसमर्थगडाची रचना एखाद्या भुईकोट किल्ल्याप्रमाणेच करण्यात आली आहे.

चिपळूणपासून अवघ्या 3 किलोमीटरवर आहे परशुरामाचं मंदिर. डोंगरात असलेल्या या मंदिरामध्ये काम – परशुराम आणि काळ यांच्या मूर्ती आहेत. काहीजण त्यांना ब्रह्मा- विष्णू-महेश यांचे अवतार मानतात. भगवान विष्णूंचा सहावा अवतार म्हणून भगवान परशुराम यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांनीच कोकणाची निर्मिती समुद्रात एकेठिकाणी बाण मारून केली, असं सांगितलं जातं. हे हिंदू मंदिर असलं तरी त्यासाठी पैसे जंजिऱ्याच्या सिद्धीने दिले होते आणि पोर्तुगीज कारागीरांनी मंदिर बांधलं असं सांगतात. त्यामुळे या मंदिराचा घुमट चर्चसारखा आहे तर गिलावा मुस्लिम पद्धतीने केलेला आहे. परशुराम मंदिरापासून जवळच रेणुकामंदिर आणि बाणगंगा तीर्थकुंड आहे.

अक्षयतृतीयेला या ठिकाणी मोठा उत्सव असतो. खुद्द चिपळूण शहराच्या रावतळे भागात विंध्यवासिनीची अष्टभूजा मूर्ती असणारं मंदिर आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात सहा मुखांच्या कार्तिकेयाचीही मूर्ती आहे. चिपळूणच्याच उत्तरेला नागेश्‍वर लेणी आहेत.
चिपळूणला गेलेला माणूस संगमेश्‍वरला गेला नाही, असं होत नाही. संगमेश्‍वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे. याच ठिकाणी मुघलांनी संभाजी महाराजांना कैद केलं होतं. कसबा संगमेश्‍वर या गावातील मंदिरं कलात्मक शिल्पांसाठी प्रसिद्ध आहेत. शास्त्री व अलकनंदा नद्यांच्या संगमावर संगमेश्‍वराचं मंदिर आहे. याखेरीज याच परिसरातल्या आरवली, बोळीवली व राजवाडीमध्ये गरम पाण्याचे झरे आहेत.

गुहागर हे रायगड जिल्ह्यात असलं तरी चिपळूणपासून आहे अवघ्या 44 कि.मी. अंतरावर. इथे प्रसिद्ध व्याडेश्‍वर मंदिर आहे. पायी भटकत फिरण्याची आवड असलेल्या मंडळींनी येथून अंजनवेलपर्यंत बसने जाऊन गोपाळगड परिसरात पदभ्रमंती करायला हरकत नाही. गुहागरच्याच दक्षिणेला 25 कि.मी. अंतरावर वेळणेश्‍वर हे शास्त्री नदीच्या तीरावरचं गाव आहे. येथील प्राचीन शिवमंदिराच्या परिसरात महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते.

गुहागरपासून 18 किलोमीटरवर “हेदवी’ हे गणेशाचं स्थान. इथल्या मंदिरात गणपतीची संगमरवरी दशभुज मूर्ती आहे. गळ्यात नाग असलेल्या या दशभुज गणेशाची स्थापना केळकर स्वामींनी केली आहे. या मंदिरात माघी चतुर्थीला उत्सव असतो. हेदवीच्या किनाऱ्यावर उमामहेश्‍वरचं एक मंदिरही आहे. दर तीन वर्षांनी प्रकटणारी गंगा हे राजापूरचं वेगळं आकर्षण असल्याचं सांगतात. राजापूरपासून जवळच उन्हाळे या गावी कायमस्वरुपी गरम पाण्याचे झरे आहेत. आणि हो, राजापुरातलं धूतपापेश्वराचं मंदिर तर अगदी वेळ काढून, आवर्जून पाहण्याजोगं आहे.

लोभस निसर्ग आणि ताजे मासेही…
दापोली तालुक्‍यात हर्णे हे निसर्गरम्य बंदर आणि सुंदर समुद्रकिनारा असणारं गाव आहे. इथला निसर्ग नि निवांतपणा अनुभवण्यासाठी राहावंसं वाटतं. इथे स्थानिक लोकांनी सुपारीच्या बागांमध्ये छोट्या झोपड्या बांधून ही हौस भागवायची सोय केली आहे. येथून जवळच आहे सुवर्णदुर्ग हा भुईकोट कम जलदुर्ग. इथून “तरी’ने जोग नदी ओलांडली की आंजर्ले हे गाव लागतं. इथे कड्यावरती चढून गणपती मंदिराला भेट द्यावी लागते. पन्हाळी काजीच्या लेण्यांना भेट द्यायची असली किंवा केळशी गावातील गणेशमंदिर, वेळासमधील रामेश्‍वर मंदिर, हिम्मतगड पाहायचा असेल तर त्यासाठी हर्णे येथून जाता येतं. इथून जवळच आहे मुरुड. महर्षी अण्णासाहेब कर्वे यांचं जन्मस्थळ. इथे त्यांचं स्मारकही आहे. या ठिकाणाला लाभलेल्या स्वच्छ, सुंदर किनाऱ्यामुळे, नारळी-पोफळींनी सजलेल्या सृष्टीमुळे इथे भटकायला मजा येते. या ठिकाणाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याचं काम चालू आहे. लाकडावरील अप्रतीम कोरीव काम असलेल्या इथल्या पुरातन दुर्गा मंदिरात शारदोत्सव, वसंतोत्सव साजरे केले जातात.
कोकणात मिळतात माशांचे विविध प्रकार… पण शाकाहारी माणसांनाही सोलकढी, भाजणीचं थालीपीठ व वडे, घावन, हळदीच्या पानावरचे पातोळे, सांजणं, डाळिंब्यांची उसळ, मौसमानुसार गेलात तर ओल्या काजुगराची उसळ, उकडीचे मोदक अशा प्रकारचे पदार्थ चाखता येतात. समुद्रकिनारी बसून भरलेली पापलेटं, खेकडे, शिंपले (तिसऱ्या) खाणं याचा एक वेगळा आनंद असतो. याखेरीज गोडसर शेवकांडं तसंच कोकम, आंब्यांचा त्या-त्या हंगामात पर्यटक आस्वाद घेऊ शकतात. घरचा पाहुणचार अनुभवताना कोलंबीचं भुजणं, तांदळाची भाकरी आणि खूपसा भात हे कॉंबिनेशन एकदा खाल्लं की चोखंदळ पर्यटकांना तृप्तीची अशी काही ढेकर येते की……बस्स्‌!

लालमाती, गडदुर्ग, सागराची गाज, मासेही- सिंधुदुर्ग

नवम्बर 14, 2008

2008-10-11_15-29-01_med_8064f71b_n_000_000_000

पर्यटकांना खुणावणारे रामलिंग बेट

नवम्बर 14, 2008

1116_shl4nov_lसंथ वाहणार्‍या कृष्णामाईच्या छायेत अनेकजण सुखी समाधानाचं जीवन जगत आहेत.हीच कृष्णा नदी अनेकांचे जीवन फुलवीत पुढे जाते. कृष्णाकाठाला महत्त्व असण्याचे इतरही कारणे आहेत. सांगलीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पद्मभूषण वसंतदादा पाटील यांची तर कराड येथे प्रितीसंगमावर भारताचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांची स्मारके उभी आहेत. याच ठिकाणी असलेल्या रामलिंग बेटाचा पर्यटनाच्यादृष्टिने विकास करण्यात आला आहे. सुशोभिकरणामुळे हा परिसर पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण बनला आहे. या स्थानाला भेट देणार्‍या पर्यटकांची संख्यादेखील वाढली आहे.

सांगली, सातारा जिल्ह्याला वरदान ठरलेली जीवनदायिनी कृष्णामाईच्या तीरावर वाळवा तालुक्यात बहे येथे रामलिंग बेटाला भेट म्हणजे पर्यटकांसाठी आनंदाची पर्वणी असते. रमणीय व निसर्गसौंदर्याने नटलेलं हे ठिकाण आज राज्याच्या पर्यटनाच्या नकाशावर झळकू लागले आहे. मुंबई – बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग क्र.४ वर इस्लामपूर शहरापासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर विकसित होत असलेल्या बहे रामलिंग बेट पर्यटन विकासासाठी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. बहे रामलिंग बेट पर्यटन विकासासाठी शासनाने गेल्या तीन वर्षापूर्वी सहा कोटी ८१ लाख ३४ हजाराचा निधी मंजूर करुन या पर्यटन स्थळाच्या विकासाला चालना दिली.

या बेटावर प्राचीन श्रीराम मंदिर व अन्य छोटी मंदिरे आहेत. राम मंदिरासमोर आकर्षक भव्य मंडप असून भव्य नदीपात्र हे पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. मंदिराच्या गाभार्‍यात राम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्ती असून बाजूला मठामागे समर्थ रामदासांनी स्थापन केलेली श्री हनुमानाची मूर्ती आहे. मध्यभागी शिवलिंग आहे.रामलिंग बेटाच्या उत्तर बाजूने कृष्णानदी काशीमधल्या गंगा नदीसारखी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाटते.या बेटावर प्रभू रामचंद्रांनी शिवलिंग स्थापन केल्याची आख्यायिका आहे. तसेच प्रभू रामचंद्र आपल्या चौदा वर्षाचा वनवास भोगून लंकेवरुन परत येत असता स्थानास या ठिकाणी थांबले, व सीतामाई जवळच्याच शिरटे गावी थांबल्या. या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी स्थान करुन वाळूचे शिवलिंग स्थापन केले व त्याची पूजा करु लागले. त्यावेळी कृष्णामाईस खूपच आनंद झाला व ती आनंदाने गर्जना करु लागली. तेव्हा प्रभू रामचंद्राच्या पाठीमागे मारुतीराया उभे होते त्यांनी ‘हा आवाज कसला’ म्हणून पाठीमागे वळून राहिले तर नदीस महापूर येत असल्याचे त्यांना दिसले व त्याच क्षणी मारुतीरायांनी आपले बलवान बाहू बाजूस केले व नदीचे पाणी थोपवून धरले. त्यामुळे नदीचे दोन वेगवेगळे प्रवास वाहू लागले आणि आपोआपच बेट तयार झाले. मारुतीरायाच्या बाहूमुळे या गावचे नाव ‘बाहे’ असे पडले. काळाच्या ओघात त्यांचाअपभ्रंश होवून बहे नाव रुढ झाले, अशी आख्यायिका आहे. या बेटावर प्राचीन श्रीराम मंदिर व अन्य छोटी मंदिरे आहेत. राम मंदिरासमोर आकर्षक भव्य मंडप असून भव्य नदीपात्र हे पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे.

मंदिराच्या गाभार्‍यात राम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्ती असून बाजूला मठामागे समर्थ रामदासांनी स्थापन केलेली श्री हनुमानाची मूर्ती व आहे. मध्यभागी शिवलिंग आहे.रामलिंग बेटाच्या उत्तर बाजूने कृष्णानदी काशीमधल्या गंगा नदीसारखी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाटते.या बेटावर प्रभू रामचंद्रांनी शिवलिंग स्थापन केल्याची आख्यायिका आहे. तसेच प्रभू रामचंद्र आपल्या चौदा वर्षाचा वनवास भोगून लंकेवरुन परत येत असता स्थानास या ठिकाणी थांबले, व सीतामाई जवळच्याच शिरटे गावी थांबल्या. या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी स्थान करुन वाळूचे शिवलिंग स्थापन केले व त्याची पूजा करु लागले. त्यावेळी कृष्णामाईस खूपच आनंद झाला व ती आनंदाने गर्जना करु लागली. तेव्हा प्रभू रामचंद्राच्या पाठीमागे मारुतीराया उभे होते त्यांनी ‘हा आवाज कसला’ म्हणून पाठीमागे वळून राहिले तर नदीस महापूर येत असल्याचे त्यांना दिसले व त्याच क्षणी मारुतीरायांनी आपले बलवान बाहू बाजूस केले व नदीचे पाणी थोपवून धरले. त्यामुळे नदीचे दोन वेगवेगळे प्रवास वाहू लागले आणि आपोआपच बेट तयार झाले. मारुतीरायाच्या बाहूमुळे या गावचे नाव ‘बाहे’ असे पडले. काळाच्या ओघात त्यांचाअपभ्रंश होवून बहे नाव रुढ झाले, अशी आख्यायिका आहे.

जवळपास अर्धा किलोमीटर रुंदीचे कृष्णा नदीचे विस्तीर्ण नदीपात्र, याच नदीपात्राचे पडलेले दोन भाग आणि त्यामध्ये निर्माण झालेले रामलिंग बेट पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरत आहे. हीच निसर्गसंपदा डोळ्यासमोर ठेऊन बहे रामलिंग बेट पर्यटनास चालना देण्यात आली. पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून हे पर्यटन स्थळ विकसित होत असून यामध्ये रामलिंग परिसर, बोटिंग धक्का, पदपथ, उपहारगृह, घाट व संरक्षक भिंत, खुला रंगमंच, तलाव, वाहनतळ, भक्तनिवास, पुजारी निवास, स्वच्छतागहे तसेच प्रभू राम व श्री हनुमान मंदिराचा जिर्णोद्धाराचे काम पूर्ण करण्यात येत आहे. मंदिराच्या अंतर्गत आणि बाह्य सुधारणाबरोबरच सभोवताली आकर्षक घाट, बेटाला संरक्षक भिंत बांधण्यात येत आहे. पर्यटकांना नौकाविहाराचा आनंद लुटता यावा यासाठी नौका तैनात असून यासाठी कृष्णानदीकाठी धक्का बांधण्यात आला आहे. तसेच सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमासाठी रामलिंग बेट परिसरात कृष्णानदीच्या पात्रात खुला रंगमंच तयार करण्यात आला आहे.

बेटाच्या दोन्ही बाजूंनी खळखळणारे कृष्णामाईचे पाणी आणि नदीपात्रातील वृक्षवल्ली पर्यटकांना मंत्रमुग्ध करीत आहेत. रामलिंग बेट पर्यटन स्थळ विकसित होत असल्याने सांगली जिल्ह्याच्या पर्यटनास नवी दिशा मिळणार असून, यातूनच जिल्ह्यातील तरुणांना पर्यटन रोजगाराचं नवं दालन उपलब्ध झालं आहे.

निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेले आणि पौराणिक पाश्वभूमी असलेल्या बहे रामलिंग बेट परिसरात पर्यटनक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत विविध सुविध निर्माण करण्यात आल्या आहेत. या सुविधांमुळे हे बेट जिल्ह्यातीलच नव्हे तर पश्चिम महाराष्टातील पर्यटकांना खुणावते आहे.

संपर्कासाठी पत्ता:
श्री. विठ्ठल पाटील
सरपंच ग्रामपंचायत बहे,
ता. वाळवा, जि. सांगली

मदुराईचे प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर

नवम्बर 10, 2008

तमिळना़डूच्या मध्यावर मदुराई वसले आहे. या मदुराईतच आहे, प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर. हिरवीगार शेती, उंच डोलणारी नारळाची झाडं नि त्याच्याशी स्पर्धा करत आकाशाकडे हात फैलावत गेलेली गोपूरे. मदुराईची ही ठळक वैशिष्ट्ये म्हणता येतील. शहराच्या बरोबर मध्ये मीनाक्षी मंदिर वसले आहे.मदुराईचा इतिहास फार मोठा आहे. अगदी ख्रिस्तपूर्व काळापासून तो सुरू होतो. मदुराईवर राज्य करणाऱ्या पांड्य घराण्याएवढे राज्य दुसऱ्या कोणत्याही भारतीय राजघराण्याने केले नाही. इसवी सनापूर्वी चारशे ते पाचशे वर्षे ते अकदी चौदाव्या शतकापर्यंत या घराण्याने मदुराईवर एकछत्रीपणाने अंमल गाजवला. मात्र, त्यानंतर अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक काफूरने पांड्यांचा पराभव करून मदुराईचा ताबा घेतला. काफूरने मीनाक्षी मंदिर, सुंदरेश्वरम मंदिराचे बाहेरचे दरवाजे व बुरूजही तोडले होते. सुदैव म्हणून आतले मंदिर वाचले. नंतर बाहेरचे गोपूर पुन्हा एकदा बांधले गेले.
मीनाक्षी शतकाच्या मध्यात विजयनगरच्या राजाने विश्वनाथ नायक याला मदुराईचा राज्यकारभार पाहण्यासाठी पाठविले. त्याच्या बरोबर सेनापती आर्यनायक मुठली हा सुद्धा गेला. नायक वंशात तिरूमलाई नायक हा सर्वांत पराक्रमी होता. त्याने 1659 पर्यंत राज्य केले. त्याच्याच काळात मदुराईत भव्य इमारती बांधल्या गेल्या.मीनाक्षी मंदिराचे सध्याचे स्वरूप हे कुणा एका राजामुळे आलेले नाही, तर अनेक राजांनी त्यात सहभाग घेतला आहे. मंदिराचे आवार भव्य आहे. 240 मीटर लांब व 260 मीटर रूंद असा हा परिसर आहे. त्याच्या या विस्तारामुळे भक्त, पर्यंटकांची दमछाक होते. काय नि किती पाहू असे होते.या आवारात अनेक छोटी, मोठी मंदिरे आहेत. येथेच एका बाजूला श्यामवर्ण मीनाक्षीदेवीची पूर्वाभिमुख मूर्ती आहे. तिच्या आजूबाजूला अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत. जवळच सोन्याचा मुलामा दिलेला स्तंभ आहे. त्याच्या उत्तरेला सुंदरेश्वर मंदिरेचा गोपूर आहे.
सुंरेश्वरम मंदिरच्या चारीही बाजूला गोपूर आहेत. त्यावर हिंदू देवदेवतांच्या, पशूपक्ष्यांच्या मूर्ती आहेत. प्रत्येक गोपूर नऊ मजली आहे. त्याचे प्रवेशद्वारे वीस मीटर उंच आहेत कुंबथडी मंडपममध्ये शंकरासह अनेक देवदेवतांच्या तसेच ऋषीमुनींच्या प्रतिमा आहेत. जवळच्याच एका कक्षात मीनाश्री व सुंदरेश्वरजी यांची वाहने आहेत. येथेच चांदीत मढवलेला हंस व नंदी आहेत. तेथून थोड्या अंतरावर मदुराईचा राजा विश्वनाथ नायक याचा मंत्री आर्य नायक मुठलीच्या काळात बनविलेला सहस्त्रस्तंभ मंडप आहे. यात एकूण 985 स्तंभ आहेत. यावरही देवदेवता, नृत्यांगना, योद्धे यांच्या प्रतिमा आहेत. या मंदिराला चार दारे आहेत. प्रवेशद्वारावर गणपतीची पमोठी प्रतिमा आहे. या मंदिराबाबत एक दंतकथा आहे. मलयाराजा पंड्या निपुत्रिक होता. म्हणून राजा व राणीने एक यज्ञ केला. यावेळी अग्नीतून तीन वर्षीय बालिका प्रकट झाली. ती होमातून बाहेर पडून थेट राणी कंचनमालाकडे गेली.
मोठी झाल्यानंतर या राजकुमारी मीनाक्षीने मोठा पराक्रम गाजवला. आजूबाजूच्या सर्व राजांना पराभूत करून तिने स्वतःचा एकछत्री अंमल प्रस्थापित केला. त्यानंतर कैलास पर्वतावर जाऊन शंकराची आराधना केली व त्याला पती म्हणून मिळविण्यात ती यशस्वी ठरली. मीनाक्षी मंदिराच्या जवळच सुवर्ण पुष्करणी नावाचे सरोवर आहे. त्याच्या बाजूला सुंदर हिरवाई आहे. फेब्रुवारी महिन्यात मीनाक्षी व सुंदरेश्वर यांच्या मूर्तीला येथे आणून या सरोवरात स्नान घातले जाते. अलगार मंदिरमदुराईपासून अठरा किलोमीटरवर मीनाक्षीदेवाचा भाऊ अलगार याचे मंदिर आहे. त्याच्यासंदर्भातही एक दंतकथा सांगितली जाते. मीनाक्षीदेवीच्या लग्नाला अलगार निघाला होता. मात्र, नगरात पाऊल ठेवण्याआधीच त्याला लग्न झाल्याचे कळले. तो आल्यापावली परत गेला. चैत्रात मीनाक्षीदेवी व सुंदरेश्वर यांचा विवाह सोहळा होततो. विवाहनंतर वेगा नदीच्या किनाऱ्यावर दोन्ही प्रतिमा आणल्या जातात. नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर अलगाराची प्रतिमा आणली जाते नंतर ती परत नेली जाते.

त्रिंबकेश्वर

नवम्बर 10, 2008

img1070506042_1_1नाशिक पासून 30 कि.मी. अंतरावर‍ गोदावरी नदीच्या तीरावर त्रिंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र आहे. येथील शिवलींगाचे वैशिष्ट म्हणजे या शिवलींगावर ब्रम्हा, विष्णू, महेश यांची रूपे आहेत.
येथील देऊळ पुर्णपणे काळ्या दगडापासून बनले असून ब्रम्हगीरीच्या पवाताच्या पायथ्याशी आहे. वेगवेगळे धार्मिक कार्यांसाठी महाराष्ट्रातून लोक येथे येतात.
नारायण-नागबळी, काल-सर्प शांती, त्रिपींड विधी येथे केल्या जातात. नारायण नागबळी ही पुजा फक्त त्रिंबकेश्वर येथेच केली जाते. ही पुजा तीन दिवसांची असते.येथे ब्राम्हणांची संख्या पुष्कळ आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर आश्रम व मठ आहेत. पावसाळ्यात येथे निसर्ग सौंदर्य पाहण्यासारखे असते.

जाण्याचा मार्ग : नाशिक पासुन 30 कि.मी. अंतरावर हे देऊळ आहे.

नवेगांव बांध अभयारण्य – प्राणी, पक्ष्यांच्या सानिध्यात

नवम्बर 10, 2008

नवेगाव येथील अभयारण्यात दरवर्षी हिवाळ्यात जगभरातील स्थलांतरित पक्षी भेट देतात. संपूर्ण महाराष्ट्रात आढळणार्‍या पक्ष्यांच्या प्रजातींपैकी निम्म्याअधिक प्रजाती नवेगांव बांध परिसरात आढळतात. नवेगावच्या हिरव्यागार टेकड्यांमध्ये वसलेला आहे. नवेगाव तलाव येथील निवांत व नीरव शांततेत पक्षी निरिक्षणाचा आनंद अवर्णनीय आहे. आपली दुर्बिण घेऊन तलावाच्या नजीक असलेल्या मनोर्‍यावर टेहळणी करता येते. सभोवतालचा परिसर न्याहाळत, विविध पक्ष्यांचे निरिक्षण करताना वेळ कसा निघून जातो ते कळत नाही. पक्ष्यांच्या हालचाली, सवयी, वैशिष्ट्ये टिपत नोंदी घेता येतात. जराही खळबळ केली की चाहूल लागून प्राण्यांनी पळ काढलाच म्हणून समजा. हे दुर्मिळ क्षण कॅमेर्‍यात टिपल्यास आठवणींच्या देशात कधीही जाता येते.
या तलावास एकीकडून मोठी भिंत बांधण्यात आली आहे. भितीच्या पलिकडे बघितल्यास प्रचंड जलाशयाचा साठा दृष्टीस पडतो. क्षितिजापर्यत निळेशार पाणी. धरणास सभोवताली टेकड्यांनी वेढले असून हिरव्यागार वनश्रीने त्या नटलेल्या आहेत. येथील जंगलात अस्वल, सांबर, चितळ, चित्ता यासारखे प्राणी आढळतात. प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ डॉ सलिम अली पक्षी अभयारण्य, हरणांचा पार्क व सुंदर बगिचे येथे आहेत. अभयारण्यात रात्रीचा प्रवेश दिला जात नाही, तेव्हा सकाळीचे गेलेले बरे. येथे येण्यासाठी आधी येथील अभयारण्य व्यवस्थापनाशी संपर्क साधणे महत्त्वाचे आहे. साहसी पर्यटकांसाठी तलावातून नौकानयन करण्याची सुविधाही आहे. सगळीकडे हिरवाईने नटलेल्या टेकड्यांच्या मध्यभागी शांत निळ्याशार पाण्यावरून वाहणारा थंडगार वार्‍याचा स्पर्श अनुभवत वल्हवत रहाणे यासारखे सुख नाही.
जाण्याचा मार्ग ः नवेगाव बांध येथे जाण्यासाठी विमानाने जवळच्याच नागपुर विमानतळावर उतरावे लागेल. तेथून हे अभयारण्य 150 किलोमीटरवर आहे. रेल्वेने जायचे झाल्यास देऊळगांव रेल्वे स्टेशन येथून अवघ्या दोन किलोमीटरवर आहे. नवेगावपासून अभयारण्य 10 किलोमीटर आहे.

माळशेज घाट (पावसाळी पर्यटन) – डोंगरदर्‍यात हरवून जाण्यासाठी

नवम्बर 10, 2008

माळशेज घाट सह्याद्री पर्वताच्या नैर्सगिक वैविध्याने नटलेला परिसर पुणे व मुंबईवरून सारख्याच म्हणजे 150 किलोमीटरवर आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी किंवा लागून सुट्ट्या आल्यात की माळशेज घाट पर्यटकांनी ओसंडून वाहतो. या घाटाचे सौंदर्यच तसे आहे. सर्वांना मोहवून टाकणारे. उंच पर्वरांगातून निघालेल्या चिंचोळ्या वाटा, खळाळत कोसळणारे धबधबे, लांबच लांब पसरलेला दर्‍यांयांमधील प्रदेश आणि चोहोबाजूंनी पसरलेल्या हिरव्यागार रांगांमध्ये पसरलेली टेबल लँड. या टेबल लँडच्या चोहीकडून वारे प्रचंड वेगाने वाहतात. माळशेज घाटात गिर्यारोहकांसाठी आव्हानात्मक आहे.
पर्यावरणं अभ्यासकांची तर ही प्रयोगशाळा आहे. पावसाळ्यात ढगासोबत चालत व दवबिंदूंच्या धुक्यात खोल दर्‍यात कोसळणार्‍या धबधब्यांचा थरार अनुभवणे म्हणजे निव्वळ अप्रतिम. मान्सून संपल्यावर गुलाबी थंडी‍त मोकळ्या आभाळाखाली तळ्याच्या काठी मस्त तंबू ठोकूनं शेकोटी पेटवायची अन रात्रीचं सौंदर्य न्याहाळत, चांदण्यांशी गूजगोष्टी करत रात्र घालवण्याचा कार्यक्रमही भन्नाटच. येथूनच जवळच सात किलोमीटरवर हरिश्चंद्र गड आहे. येथील कोकण कडा गिर्यारोहकांना आव्हान आहे. या कड्याची उची आहे 1424 मीटर. मग पझल पाँईट जवळ करायचा.
बघायच आपण जंगला‍त वाट चुकतो की आपल्या ठिकाणावर परत येतो. येथील जैवविविधतेने समृद्ध जंगला‍त अनेक पक्षी आणि प्राणी सुरक्षित वातावरणात शांतपणे वाढतात. त्यांचे निरिक्षण करता येणे शक्य आहे. माळशेज रांगांमध्येच तिसर्‍या शतकातील बौद्ध गुहा आहेत. अष्टविनायकातील ओझर व लेण्याद्री ही ठिकाणे येथून जवळ आहेत. ज्योतिर्लिंग भीमाशंकरही येथून जवळच आहे. छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान येथून 35 किलोमीटरवर शिवनेरी आहे. घाटात आल्यास या ठिकाणीही जाता येईल.
जाण्याचा मार्ग ः माळशेज घाटात जाण्यासाठी पुणे व मुंबईहून बस आहेत. मित्रांसोबत मौज करत जायचे असेल तर गाडी करून जाणे सोयीस्कर. जवळचे रेल्वे स्टेशन कल्याण आहे.

दर्शन द्वारकाधीशाचे आणि सोमनाथाचे

नवम्बर 10, 2008
img1080404015_1_4सोळा कलांनी परिपूर्ण असलेल्या द्वारकाधीशाचे दर्शन घेण्याची माझी फार दिवसाची इच्छा होती. माझे मानस माझ्या मुलाने जाणले होते. अखेर द्वारकाधीशानेही माझी हाक ऐकली. जवळ जवळ 10-15 वर्षापासून मी त्याच्या दर्शनाची आस धरली होती. पण त्या राजाधीराजाला माझ्या हांके कडे लक्ष देण्यास वेळच नसावा किंवा — असो! काही ना काही अडचणी येत होत्या आणि जाणे जमत नव्हते. भगवंताने जेव्हां माझी हाक ऐकली तेव्हा त्याने मला त्याच्या चरणाकमळापाशी येण्याची परवानगी दिली.

 

त्याच्याच आदेशानुसार आम्ही दोघे, चि. अमोलकडे मुंबईला पोहोचलो. चि. अमोलने 31 डिसेंबरपर्यंत सर्व कार्यक्रम आखून ठेवला होता. आरक्षण करून ठेवले होते. मग आम्ही मुलगा सून व नातवासोबत मुंबईहून अहमदाबाद एक्सप्रेसने निघालो. अहमदाबादला सकाळी पोहोचलो. गांधीनगर येथील ‘केन्द्रीय सुरक्षाबल’ ह्याच्या केंद्रीय सरकारी विश्रामगृहात थांबलो. स्नान, नाश्ता आटोपून गांधीनगरला असलेले स्वामी नारायण मंदिर पाहायला गेलो. या मंदिराला ‘अक्षरधाम’ असे म्हणतात. मंदिराचा परिसर अत्यंत स्वच्छ आहे.

 

आम्ही ह्या पवित्र परिसरात शिरलो आणि जादूची कांडी फिरावी त्या प्रमाणे काहीसे मनाचे झाले. मन दिपून गेले. डोळे आश्चर्यचकीत झाले. देवळातल्या प्रथमदर्शनी भागात दुतर्फा कारंजाची सजावट आहे. ती पाहिली आणि ‘ताजमहल’ची आठवण झाली. दुपारी सुद्धा कारंजावर दिवे लागले होते आजूबाजूला सुंदर हिरवळ आणि बाग आहे. ते दृष्य पाहात पाहात आम्ही मंदिरात प्रवेश केला तेथील भारदस्त लाकडी खांब्याचे कोरीव काम पाहून मन भारावून गेले. वास्तुशास्त्राच्या कल्पनेचे कौतुक वाटले. जवळ जवळ 15 फूट उंचीचे नारायण स्वामींची पिवळी पिवळी धम्म मूर्ती मनाचा ताबा घेते. ही मंगलमय मूर्ती तांब्याची असून त्यावर सोन्याचे पॉलिश आहे. मूर्ति अत्यंत रेखीव आहे. त्याच प्रमाणे सजीव वाटते.

 

देव्हार्‍यातून बाहेर पडून डाव्या बाजूने वळले की खाली उतरण्यास पायर्‍या आहेत. पायर्‍या उतरून गेलो की मोठी मोठी दालने आहेत. पहिल्या दालनात एक मोठा संगमरवरी दगड आहे. त्यात एक सुंदर मूर्ती कोरली आहे, त्या मूर्तीच्या एका हातात हातोडा व दुसर्‍या हातात छन्नी आहे. ते पाहून ती मूर्ती आपल्याला संदेश देते असे वाटते. कोणता संदेश? मानव हा एक र्निर्विकार दगड आहे. विवेक आणि वैराग्य ह्या छन्नी-हातोड्याने माणसाने स्वत:चे आयुष्य स्वत: घडवावे, असा संदेश आपल्याला मिळतो.

 

हा संदेश घेऊन आम्ही वाट चालू लागलो तर दर्शन घडले ते आकाशाचे. निळे काळे आकाश! आकाशातील नक्षत्र ग्रह तारे तारे यांचा खेळ पाहात पाहात पुढे चालावे तर दाट जंगल दिसू लागले, किर्र झाडी. त्यात पशुपक्षी वावरतांना दाखविले आहेत. हे सारे दगडांचे बनविले असून तेथील दृश्य मनोहर आहे. ह्या जंगलात स्वामी नारायणांची पांढर्‍या दगडाची मूर्ती आहे. स्वामी तपाला बसलेले आहेत ते पाहून वाटले की निर्जीवाला सजीवत्व प्राप्त झाले आहे. चालताना पुढल्या दालनात केव्हा प्रवेश केला कळलेच नाही. या दालनात सर्वत्र अंधार. पडद्यावर चार खाणीतील चार प्राणी दाखविले आहेत ते पाहून ‘पृथ्वीवरील विविध प्राण्यांच्या देहांचे वैज्ञानिक पृथ:करण करून एक पेशीय देह उत्क्रांत होत होत मानवी देहाची निर्मिती झाल्याची, उत्क्रान्तीवादाची नवीन दृष्टी जगाला देणार्‍या, डार्विनच्या सिद्धान्ताची आठवण झाली. मानवी जीवनांत जगण्याची चाललेली धडपड, विज्ञानाची होत असलेली प्रगती, त्यापासून होणारे फायदे तोटे, त्यावर उपाय म्हणून अध्यात्मिक जीवनाची दिशा दाखविणारे संत, मानवी जीवनाचे ध्येय सांगणारे योगी, सोंगी भोगी सार्‍यांची जीव जगण्याची धडपड, निसर्गाचा प्रकोप, एक न दोन अनेक चित्र आपल्याला त्या पडद्यावर दाखविले जातात.

 

श्रीकृष्णाने अर्जुनाला दाखविलेले ‘विश्वरूप’ आपण पाहात आहोत असे वाटते. त्यागुरुशिष्याच्या स्मृतिला आपण नतमस्तक होतो. मला तरी तसे काहीस वाटले. पुढे पाउले चालत होती एकदम महाभारत काळात पोहोचल्याचा भास झाला चौंसराचा डाव मांडून बसलेले कौरव पांडव, द्रौपदी वस्त्र-हरणाचा प्रसंग, सर्व सजीव मूर्तीच्या माध्यमातून दाखविले आहे. पुढे रामायणातील प्रसंग रंगविले आहेत. शेवटचा देखावा तर अतिशय बोलका आपले देहभान हरविणारा! स्वामी नारायण स्वत: सिंहासनावर विराजमान झाले आहेत त्यांच्या डाव्या बाजूला त्यांचे खास दरबारी सरदार आसनस्थ झाले आहेत, उजव्या बाजुला गाणार्‍यांचा संघ बसला आहे ह्या सार्‍यामूर्ती प्रत्यक्ष हावभाव करीत गात आहेत.

 

राजे नारायण स्वामी त्यांच्या गाण्याला दाद देत आहेत. एक सरदार नम्रपणे हात जोडून राजांना प्रश्नविचारीत आहे. महाराज हातातील फुलाचा सुवास घेऊन उत्तर देत आहेत. ह्या सार्‍या मूर्ती निर्जीव आहेत हे आपण विसरूनच जातो. भारावलेल्या मनाने आपण जेव्हां बाहेर पडतो, तेव्हां वेगळेच काही भव्य दिव्य पाहिल्याचा आनंद मिळतो व आनंदाची जाणिव होते. कोणी म्हणेल हे का द्वारकेचे दर्शन? पर सर्वाभूती असलेल्या त्या द्वारकाधीशाचेच हे दर्शन नाही का?

ऐतिहासिक वैभवाचे साक्षीदार किल्ले धारूर

नवम्बर 10, 2008
img1071203006_1_1घाटावर वसलेलं हे शहर असल्यामुळे गावाचं आरोग्य चांगलं आहे. खवा आणि सीताफळाची ही महत्त्वाची बाजारपेठ असून मुंबई, पुणे, नाशिकपर्यंत या मालाची निर्यत केली जाते. या गावाच्या नावात त्याची भौगोलिक वैशिष्टे सामावली आहेत. धारेवरील स्थान म्हणून धारकर, धारौर, धारूर अशी नावे रूढ झाली असावीत. धार या शब्दाचे दोन अर्थ होतात. डोंगराच्या काठावर आणि अखंड वाहणार्‍या पाण्याच्या धारेवर हे गाव वसलेलं आहे. तसेच गावाजवळच धारेश्वराचे भव्य हेमाडपंथी मंदिर आहे. मोगल राजवटीत अहमद नगरच्या निजामशाहीने या गावाचे नाव बदलून फतेहाबाद असे ठेवले. पण मध्ययुगीन कागदपत्रात किल्ले धारूर अशीच नोंद आढळते. मजबूत आणि प्रशस्त किल्ल्यामुळे मोगल काळात या शहराला विशेष महत्त्व होते. राजा धारसिंहामुळे या गावचे नाव धारूर पडले. अशी माहिती अनेक जण सांगतात. पण प्रत्यक्षात तशी नोंद कुठे सापडत नाही.

 

या स्थानाचा विकास काळाच्या ओघात होत गेला. आज मध्यम वाटणारे हे गाव मध्य युगामध्ये राजकीय दृष्टा स्वतःचे वेगळे अस्तित्त्व टिकवून होते. उत्तर मध्ययुगीन कालखंडात चंदीप्रसादजी मिश्रा, नगराध्यक्ष स्वरुपसिंह जहारी, रामचंद्र शंकर शेटे, प्रमोद माधवराव शेटे, सद्दिवाले यांचे पूर्वज इथे आले आणि त्यांनी स्वतंत्र वसाहती वसवल्या. धारूरच्या वाढत्या विस्ताराबरोबरच नगररचनेत आवश्यक त्या वास्तुंची निर्मिती होत होती. पाणी पुरवठ्यासाठी ज्या बारवाची निर्मिती करण्यात आली त्यात २ हरिणपीर बावडी, रंगारोनी बावडी यांचा उल्लेख करावा लागतो. यापैकी काही विहीरीवर शिलालेख कोरलेले आढळतात. उत्तर मध्ययुगामध्ये बांधण्यात आलेला एक महाल कलावंतिणीचा महाल म्हणून ओळखला जातो. गावाच्या बाहेर एक स्वतंत्र वास्तू चेकपोस्ट स्वरूपात उभारण्यात आली होती. आज गावात उभे असलेले प्रमुख प्रवेशद्वार आणि मशीद तत्कालिन कला वैभवाची साक्ष आहे. गावाला संपूर्ण दगडी तटबंदी होती. कधीकाळी हातमाग हा व्यवसाय इथे खूपच जोरात होता. धारूरचे शेले, साडा, धोतरजोडे प्रसिद्ध होते. पण आज हा व्यवसाय संपूष्टात आला आहे.

 

किश्वरखानने महादुर्गाची उभारणी केल्यानंतर त्यांनी धारूर शहराची अत्यंत योजनापूर्वक वसाहत केली. व्यापारी, उद्योगपती, विद्वान ब्राह्मण, सरदार आदींना निमंत्रित करून धारूर शहराचा नियोजनपूर्वक विकास केला. सन १६५८ साली सोनपेठ येथील प्रसिद्ध व्यापारी पापय्या शेटे यांना सन्मानाने निमंत्रित करून त्यांना रोअगिरी दिली. पापय्यांनी आपल्या बरोबर आणखी काही व्यापार्‍यांना बोलावून धारूरची बाजारपेठ वसवली, वाढवली. त्याकाळी या शहराचा लौकिक सर्वदूर पसरला होता. आजही मराठवाडातील एक महत्त्वाची विश्वसनीय बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. दूरवरून सोनं, चांदी खरेदीसाठी लोक इथे येतात. सुवर्णकारांची संख्याही इथे फार मोठी आहे. आज कोल्हापूर, सोलापूर, बार्शी, औरंगाबाद, अंबाजोगाई इत्यादी शहरात सुवर्ण काम करणारे कारागिर धारूर शहरातीलच आहेत.

 

धारूर ही एक श्रीमंत बाजारपेठ असल्यामुळे दातृत्व हा या गावचा धर्म आहे. अनेक मंदिराच्या उभारणीसाठी तलाव, विहिरीच्या बांधकामासाठी सढळ हाताने देणगी दिल्याच्या नोंदी कागदपत्रातून सापडतात. यादवांच्या काळात धारूर हे एक देश विभागाचे केंद्र म्हणून उदयास आले. या विषयी नोंद करणारा शिलालेख अंबाजोगाई येथे आहे. सकलेश्वर देवस्थानच्या निर्मितीसाठी दिलेल्या दानपत्रात या स्थानाची नोंद सिंघन यादवाचा सेनापती खोलेश्वर (शके ११३२ ते ११६९) हा करतो. या दान लेखात प्रासादह्न सकलेश्वरस्य रचितो धारो देश अशी नोंद आहे.

 

किल्ल्यामुळे धारूर शहराचे वैभव वाढले. लोकांचा राबता वाढला. अदिलशाहीचा सिपाह सालार किश्वरखान याने मूळ राष्ट्रकूट कालीन महादूर्ग असलेल्या जागेवर नव्याने अत्यंत मजबूत असा दूर्ग बांधला. सन १५६७-६८ साली हा दूर्ग बांधून पूर्ण केला. किल्ल्यावर शस्त्रसाठा भरपूर गोळा केला. किल्ल्याच्या तिन्ही बाजूला पाणी (खंदक) आणि चौथ्या बाजूला खोल दरी त्यामुळे शत्रूला किल्ला हस्तगत करणे सोपे नव्हते. धारूरच्या व्यवस्थित नियोजनाची नोंद जशी बुसा तीज-उस-सलातीन या ग्रंथात फकीर अहमद झुबेरी यांनी करून ठेवली आहे. तसेच अब्दुल हमीद लाहरी याने आपल्या बादशहानाम्यात केली आहे. हा किल्ला सहजा सहजी जिंकणे अशक्य असल्याचीही नोंद त्यांनी केली आहे. मात्र प्रत्यक्षात ज्यांनी किल्ला बांधला तोच किश्वरखान फितुरीमुळे मारला गेला. किल्ला बांधत असताना अंकुश खान याने किश्वर खानला अंधारात ठेऊन किल्ल्याचा काही भाग जाणीवपूर्वक पोकळ ठेवला व याच मार्गाने निजामशाही सैन्याने किल्ल्यात प्रवेश करून किश्वर खानचा वध केला.

 

मुर्तजा निजामशहाला धारूर किल्ल्यात अलोट संपत्ती मिळाली. हत्ती, घोडे, जड जवाहिर, राहुटाचे सामान, शस्त्रास्त्रे, बंदूका मिळाल्या. या किल्ल्यात काही काळ अहमदनगरच्या निजामशहचा मुक्काम होता. त्यानेच विजयाचे प्रतीक म्हणून या गावाचे नाव बदलून फतेहाबाद ठेवले. हे नाव बदलण्यासाठी स्वातंत्र्यानंतर धारूरच्या जनतेनी खूप प्रयत्न केला व अखेर ५ मे १९७२ रोजी पुन्हा फतेहाबादचे धारूर असे नामकरण झाले. त्यांनतर याच किल्ल्यात काही काळ विठोजी राजे भोसले थांबले होते. तर राजे शिवबाचा उजवा हात म्हणून ओळखला जाणारा नेताजी पालकर याच किल्ल्यात मुक्कामास होता. शिवरायांबरोबर मतभेद झाल्यावर नेताजी पालकर आदिलशहीस जाऊन मिळाला. मोगलांनी नेताजीस आपल्याकडे वळवून घेतला. त्यास पाच हजाराची मनसब, पन्नास हजार रुपये रोख तसेच जहागिरी दिली. पण राजे शिवबा आग्रा किल्ल्यातून निसटताच औरंगजेबाने एका आदेशान्वये नेताजीस कैद करून दिल्लीस घेऊन या असा आदेश दिला.

हिमालयाच्या कुशीतले मसुरी

नवम्बर 10, 2008
उत्तर प्रदेशातून वेगळे करण्यात आलेल्या उत्तरांचलला नैसर्गिक सौंदर्याची जणू भेटच मिळाली आहे. हे राज्य दोन भागात आहे. एक गढवाल मंडल व कुमाऊ मंडल. गढवाल मंडलमध्ये दहा पर्यटन स्थळे येतात. त्यातले प्रमुख आहे मसूरी. मसूरी म्हणजे निसर्गाचा अप्रतिम अविष्कार. म्हणूनच या भागात मसूरीला ‘पहाडों की रानी’ असे म्हणतात. हिमालयाच्या कुशीत २००५ मीटर उंचीवर हे गाव वसले आहे. हे गाव ज्या टेकडीवर बसले त्याचा आकारही ‘सी’ अक्षरासारखा आहे. याच्या उत्तर भागातून पाहिल्यास हिमाच्छादीत हिमालय दिसतो, तर दक्षिणेत द्रोणस्थली दिसते. पूर्वेला टिहरी-गढवाल व पश्चिमेला चकराता दिसते. कॅप्टन यंगने १८२७ मध्ये हे पर्यटन स्थळ शोधून काढले असे म्हणतात. मसूराची रोपे इथे बर्‍याच प्रमाणात होती, म्हणूनच त्याला मसूरी हे नाव पडले. डेहराडूनचे छत ही सुद्धा मसूरीची ओळख आहे.

 

इतर हिल स्टेशनपेक्षा मसूरी वेगळे आहे. मसुरीत पहिल्यांदा लंढोर बाजार वसविला गेला. त्यानंतर त्याचा इतरत्र विस्तार झाला. उन्हाळ्यात तिकडे मैदानी प्रदेशात उन्हाच्या चटक्यांनी लोग भाजून निघालेले असताना इथले वातावरण मात्र थंड असते

 

मसूरी परिसरातील पर्यटनस्थळे-

 

मनहिल- या डोंगरावर म्हणे इंग्रजांनी एक तोफ ठेवली होती. ती रोज बारा वाजता डागली जायची. म्हणून या टेकडीचे नाव गनहिल पडले. खरे तर तिची उंची पाहिल्यानंतर तिला टेकडी म्हणण्याचे धाडस होणार नाही. तिची उंची आहे ७२०० फूट. येथे मालरोडवर असलेल्या रोपे वेनेही जाता येते. पायीसुद्धा येथे जाता येते. गनहिलवरून दुनघाटी, जौनपूर घाटी, ऋषिकेशसह चकराता डोंगररांगा व हिमाच्छादीत शिखरांचे दर्शन घेता येते.

 

कॅंप टी फॉल- मसूरी-यमनोत्री मार्गावर मसूरीपासून पंधरा किलोमीटरवर असलेला हा धबधबा पाच धारांमधून कोसळतो. त्यामुळे हा धबधबा पहाण्यासारखा आहे. समुद्रसपाटीपासून याची उंची चार हजार पाचशे फूट आहे. त्याच्या चहू बाजूंनी डोंगररांगा दिसतात. इंग्रजांची ‘चहा पार्टी’ म्हणे इथेच व्हायची. म्हणूनच या धबधब्याला कॅप टी असे म्हणतात.

 

लेकमिस्ट- कॅप टी धबधब्याहून परतताना लेकमिस्टला येता येते.

 

म्युन्सिपल गार्डन- पूर्वी या उद्यानाला बोटॅनिकल गार्डन म्हणून संबोधले जात असे. प्रसिद्ध भूशास्त्रज्ञ डॉ. एच. फाकनार लोगी यांनी त्याची निर्मिती केली होती. १८४२ च्या सुमारास या भागाल एका सुंदर उद्यानात परावर्तित केले. त्यानंतर याची देखभाल कंपनी प्रशासनाकडून व्हायला लागली. म्हणून आता त्याला कंपनी गार्डन किंवा म्युन्सिपल गार्डन असे म्हटले जाते.

 

तिबेटी मंदिर- बौद्ध संस्कृतीचे प्रतीक असणारे हे मंदिर पर्यटकांचे मन मोहून घेणारे आहे. या मंदिराच्या मागे ड्रम लावले आहेत. ते वाजविले असता आपली कोणतीही इच्छा पूर्ण होते, अशी समजूत आहे.